बारामती – तालुक्यातील वनक्षेत्रामध्ये लवकरच पशुपक्षी निरिक्षण सफारी होणार आहे. बारामती तालुक्यातील गाडीखेल, शिर्सुफळ, पारवडी, साबळेवाडी या ठिकाणच्या वन्यक्षेत्रात ही सफारी प्रस्तावित आहे.
बारामती तालुक्यात अशा प्रकारे वन्यजीव निरिक्षणाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न आहे. येथील वनक्षेत्रात चिंकारा, लांडगा, तरस, ससे, कोल्हा यासह काही पक्षी देखील स्थलांतर करुन येतात. या ठिकाणी लोक फोटोग्राफीसह फिरायला देखील येत असतात.
ही बाब विचारात घेत या वन्यक्षेत्रात येणा-या पर्यंटकांना परिपूर्ण माहिती मिळावी व योग्य मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने दोन दिवस बारामतीत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले गेले. या निमित्ताने ज्या युवकांना गाईड म्हणून काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी वनविभागाच्या वतीने पंचायत समितीत प्रशिक्षण शिबीर आयोजित केले गेले.
बारामतीत अँनिमल सफारी देखील प्रस्तावित असून या बाबत सल्लागारांकडून योजना तयार करण्याच्या कामाच्या निविदा निघाल्या आहेत. बारामती वनक्षेत्रात असलेले निसर्गसौंदर्य व येथे वन्यजीवांचा वावर यांचा उपयोग पर्यंटन वाढीच्या दृष्टीने होण्याच्या दृष्टीने अँनिमल सफारी महत्वाची ठरणार आहे.
बारामतीत कण्हेरी भागामध्ये अँडव्हेंचर पार्कचे काम पूर्ण झाले असून त्याच्या बाजूलाच मोठी रोपवाटिका साकारलेली आहे. त्याच्या बाजूलाच बटरफ्लाय गार्डन विकसीत होणार असून भविष्यात निसर्ग माहिती केंद्र सुरु करण्याचे नियोजन आहे.
याच वनक्षेत्रावर ठिकाणी दीडशे एकरांवर जवळपास 25 हजार झाडे लावण्यात आली आहेत. येथे ठिबक सिंचनावर ही सर्व झाडे जगविण्याचा हा या परिसरातील सर्वात मोठा प्रयत्न ठरणार आहे.
थीम पार्क, बटरफ्लाय गार्डन व इतरही बरेच काही…
कण्हेरी येथील वनक्षेत्रामध्ये अँडव्हेंचर थीम पार्क साकारलेले असून त्याच्या बाजूला कन्जर्व्हेशन एरीया आहे. येथे एक अँम्फी थिएटर तयार करण्यात आले असून तेथील नैसर्गिक तळ्यात बोटिंगची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे.
येथे मुलांना झिप राईड करता येणार आहे. येथे नेचर इंटरप्रिटेशन सेंटरही (निसर्ग माहिती केंद्र) सुरु करण्याचा अजित पवार यांचा मानस आहे. या माध्यमातून निसर्गाचा अभ्यास करता येईल.- सचिन सातव, अध्यक्ष, बारामती सहकारी बँक